यावर्षीची संकल्पना

राम पुजावा, राम भजावा, राम आचरावा ..

Prabhu Shriram

 

|| श्री ||

 

          गोस्वामी तुलसीदासजींच्या 'रामचरितमानस' या रामकथेकडे पाहण्याची एक अपूर्व दृष्टी गोस्वामीजी देतात. ते म्हणतात, राम कथा हे मानस सरोवर आहे. आणि या सरोवराचे चार घाट आहेत. पहिला घाट ज्ञानाचा, दुसरा कर्माचा, तिसरा भक्तीचा आणि चौथा घाट भक्तीचा आहे. चारही घाटांवर राम कथेचा जयजयकार होतो आहे. आणि ही कथा ऐकताना तुमच्या माझ्या मनात रामाच्या विभूतीमत्वाची रमणीय रूपे साकारत आहेत. हा राम साक्षात परब्रह्म आहे. राम सद्गुणांचा, सद्विचारांचा आदर्श आहे. राम भक्त वत्सल आहे. आणि हा राम अतुल पराक्रमी, परमविवेकी असं धर्म संस्थापक राष्ट्रपुरुष आहे.

          प्रत्येक भारतीयाचे मानस-सरोवर प्रभू श्रीरामाच्या या आणि अशा दिव्य सद्गुणांनी उचंबळत राहिले आहे. प्रत्येक भारतीयाच्या वैयक्तिक श्रद्धास्थानी राम स्थित आहेच. परंतु भारतीय समाजजीवनाच्या मुळाशीही 'रामराज्य' हीच संकल्पना आहे. या राष्ट्राला परम वैभवाकडे नेणारा मार्गदर्शक म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम आहे.

          म्हणूनच, 'राम पुजावा, राम भजावा, राम आचरावा' या मध्यवर्ती संकल्पनेसह स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज होत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा श्रीशालिवाहन शके १९४२ या नववर्षदिनी फडके श्रीगणेश मंदिरापासून नववर्ष स्वागत यात्रेचं शुभारंभ होईल. ठीक ८ वाजता श्रीगणेशाची आरती व गुढीपूजन होईल. ध्वजपथक, आदिशक्ती पथक, आकर्षक रांगोळ्या, अनेक प्रात्याक्षिके, नृत्याविष्कार आणि हजारो राष्ट्रप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ही या यात्रेची महत्त्वाची वैशिष्ट्ये असतील. ठाकुरद्वार नाक्यावर नववर्ष संकल्प सभा होईल व श्रीसिद्धीविनायक दर्शन सोहळ्याने व महाआरतीने यात्रेची सांगता होईल.

          नववर्षाचे स्वागत करण्यासाठी स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या या 'रामकार्यात' सहभागी होण्याचे आपणां सर्वांना सहर्ष आमंत्रण आहे.

 

कळावे,

सुजीत मोरे

अध्यक्ष

गौरव भावे

कार्याध्यक्ष

श्रीधर आगरकर

सचिव

आशुतोष वेदक

यात्राप्रमुख