हिंदू नववर्ष स्वागत यात्रा
गिरगांवचा पाडवा
कै. सुनील निकम
चित्रकला स्पर्धा
सामाजिक संस्थांना
मदत
आमच्या बद्दल
सुजनहो नमस्कार !
'गिरगांव' ... जगाच्या नकाशावरील एक लहानसा ठिपका... अरबी समुद्राच्या निकट असलेला एक लहानसा भूभाग !
पण याच गिरगांवात लोकमान्यांना सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवावी असे वाटले. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन याच गिरगांवातून सुरु झाले. भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशींचे कार्यक्षेत्र गिरगांव होते. नाना शंकरशेटांची कर्मभूमीही गिरगांव होती.
भारताची 'पिनकोड सिस्टीम' सुरु करणारे श्री. भि. वेलणकर, व्ही. पी. बेडेकर अँड सन्स या उद्योगसमूहाचे संचालक अण्णासाहेब बेडेकर आद्य स्त्रीरोग तज्ञ डॉ. नीलकंठ पुरंदरे यांचे नाव घेताना गिरगांवकरांची मान अभिमानाने उंचावते.
थोर शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे शालेय शिक्षण गिरगांवात झाले. भारताच्या पहिल्या ग्रँडमास्टर खाडिलकर भगिनी गिरगांवच्या रहिवासी होत्या. इतकेच काय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुंबईतली पहिली प्रार्थना गिरगांवातील शाखेत सांगितली गेली आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक चळवळींचा प्रारंभ गिरगांवातून केला होता.
महाराष्ट्राचे लाडके कवी पद्मभूषण मंगेश पाडगांवकर गिरगांवचे रहिवासी होते. महाराष्ट्रभूषण सुलोचनाताई चव्हाण, ज्येष्ठ रंगकर्मी दाजी भाटवडेकरांची कलासाधनाही गिरगांवला साक्ष ठेवून घडली.
क्षेत्र... मग ते सांस्कृतिक, सामाजिक,शैक्षणिक कोणतेही असो, किंवा क्रिडा-कला साधकांचे असो... गिरगांवने हा वारसा प्राणपणाने जपला आहे.
परंतु निव्वळ वारसा जपणं पुरेसं नसतं.. तर तो पुढील पिढीकडे देणंही महत्वाचं असतं ! या दृष्टिकोनातूनच गिरगांवातील या सर्व आयामांना गेली १९ वर्षे जोडणारी एक महत्वाची चळवळ म्हणजे
'स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान'.
समाजात बोकाळलेली नकारात्मकता , येणाऱ्या पिढीची आपल्या गौरवशाली संस्कृती बद्दलची अनभिज्ञता , पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव (उदा. ३१ डिसेंबर) यावर काहीतरी ठोस करण्याचा उद्देश होता. आणि समोरची रेष कमी करायची असेल तर आपल्या रेषेची लांबी वाढवली पाहिजे या विचारातून १८ वर्षांपूर्वी गिरगांवात एक नवीन प्रयोग पुढे येऊ घातला.
गेट वे ऑफ इंडिया येथील स्वामी विवेकानंदांच्या मूर्तीला प्रत्येक वर्षी विवेकानंद जयंती (१२ जानेवारी)ला वंदन करायला जाणारी गिरगांवची काही तरुण मंडळी एकत्र जमली आणि विवेकानंदांच्याच प्रेरणेने चालणाऱ्या
'स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान'ची स्थापना झाली.