Author: svyp

तरुणाईची हिंदू नववर्ष स्वागत यात्रा

 

          जगातील एक अत्यंत युवा देश ही आपल्या देशाची आजच्या काळातील विशेष ओळख. या देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्नं आणि परम वैभवापर्यंत घेऊन जाण्याची शपथ ही याच युवाशक्तीच्या भरवश्यावर ए पी जे अब्दुल कलाम यांनी देशवासीयांना दिली होती. उत्साहाने आणि सद्हेतुने प्रेरित युवाशक्तीच काळाच्या छातीवर पाय रोवून सकारात्मक बदल घडवू शकते. अशा युवकांचे चिरस्थायी प्रेरणास्थान म्हणजे स्वामी विवेकानंद. विवेकानंदांनीच कठोपनिषदातील ही ओळ अजरामर केली “उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरान्निबोधत” – उठा, जागे व्हा, आणि लक्ष्यप्राप्ती पर्यंत थांबू नका. आणि याच संदेशाला अनुसरून अनेक युवक-युवती स्वयंप्रेरणेने या सकारात्मक बदलाच्या दिशेने पावलं टाकत आहेत.

          समाजात बोकाळलेली नकारात्मकता (उदा. ३१ डिसेंबर) , येणाऱ्या पिढीची आपल्या गौरवशाली संस्कृती बद्दलची अनभिज्ञता, पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव यावर काहीतरी ठोस करण्याचा उद्देश होता. पाश्चिमात्य विचारांच्या प्रभावाखाली जे पारंपारिक ते टाकावू आणि जे पाश्चिमात्य ते मॉडर्न टिकावू अशी चुकीची समजूत तरुणाईमध्ये रूढ होत होती. सर्वच्या सर्व परंपरा आता चालतीलंच असं नाही आणि सर्वच्या सर्व पाश्चिमात्य विचार हे वाईट असा याचा अर्थ होत नाही. जे पारंपारिक ते युगानुकूल करून घेणे आणि जे पाश्चिमात्य ते भारतानुकूल करून घेणे यासाठी एक चळवळ जन्माला आली. समोरच्या रेषेला हात न लावता आपल्या रेषेची लांबी वाढवली पाहिजे या विचारातून १६ वर्षांपूर्वी गिरगांवात एक नवीन प्रयोग पुढे येऊ घातला. दर १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीला गेट वे ऑफ इंडिया येथील स्वामी विवेकानंदांच्या मूर्तीला वंदन करण्यासाठी जाणारी तरुण मंडळी एकत्र आली आणि स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची स्थापना झाली. आणि आपल्या गौरवशाली संस्कृतीची गुढी पुढीलांच्या हातात सुपूर्द करण्यासाठी “हिंदू नववर्ष स्वागत यात्रे”चे आयोजन करण्याचे स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानने ठरवले.

          आज मुंबईत बऱ्याच ठिकाणी नववर्ष स्वागत यात्रांचं आयोजन होतं. डोंबिवली, गिरगांवातील स्वागतयात्रा प्रसिद्ध आहेतच याचबरोबर जवळ जवळ ३० ठिकाणी नववर्ष स्वागत यात्रा निघतात. लहान मुलांपासून ते अगदी आजी अजोबांपर्यंत सर्वच गुढी पाडव्याच्या या उत्सवात सहभागी होतात. तरुणाई तर खास उत्साहात यात्रेत सहभागी होते. नटून-थटून पारंपारिक वेशात युवक आणि युवती या सणाचा आनंद लुटतात.

          गिरगांवात लहानाचा मोठा झाल्याने लहानपणापासूनंच गिरगांवातली स्वागत यात्रा पहात आलो. ज्याप्रमाणे दिवाळीत स्वतः जाऊन फटाके फोडायचे, संक्रांतीला स्वतः गच्चीत जाऊन पतंग उडवायचे तसंच गुढीपाडव्याला फडके गणपती मंदिराजवळ जमायचं आणि उत्सवात सामील व्हायचं ! कोणीही काहीही न करता सगळेच आपोआप फडके मंदिराजवळ जमतात आणि प्रिन्सेस स्ट्रीट पर्यंत जातात असंच वाटायचं. गुढी पाडवा हा असाच साजरा होतो ही अनेक वर्ष भाबडी समजूत होती. कोणाला तरी यात्रेचं आयोजन करावं लागतं याची कल्पनाच तेव्हा नव्हती. दर वर्षी विशिष्ठ संकल्पना असतात. त्या संकल्पनांची घोष वाक्यं उदा. “अलग भाषा अलग वेश, फीर भी अपना एक देश”, “लोककला ही महाराष्ट्राची, गुढी उभारू समरसतेची” आणि हल्लीची “नारी के सहभाग बिना, हर बदलाव अधुरा है” ओरडत आम्ही मित्रमंडळी गिरगावातल्या गल्ली बोळात फिरत असल्याचं मला आठवतंय. अशी वाक्यं लहानपणीच जर मुलांच्या ओठांवर असली तर पुढे जाऊन हीच मुलं सकारात्मक बदलात आपला हातभार लावणार नाहीत काय? इंग्रजी कवी शेले म्हणाला होता “तुमच्या देशातील तरुणांच्या ओठावरची गाणी मला सांगा मी तुमच्या देशाचे भवितव्य सांगतो”. या गुढी पाडव्यासारख्या उपक्रमामुळे जर लहानपणीच अश्या संस्कारात मुलं मोठी होत असतील तर याला नुसता इव्हेंट म्हणणं चुकीचं ठरणार नाही का? केवळ नटून-थटून येऊन फोटो काढले म्हणून दिखाऊपणा झाला का ? या यात्रेच्या निमित्ताने आपला सण साजरा करण्यासाठी संघटीत झालेली, मेहेनत करणारी तरुणाई दुर्लक्षित करून कशी चालेल ?

          गिरगावातील स्वागत यात्रा ही स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान गेली १४ वर्षे आयोजित करीत आहे. यात्रेचं हे १५ वं वर्ष आहे. अगदी पहिल्या वर्षापासूनच आधी स्वतः कार्यकर्त्यांनी स्वतःचा निधी जमा करायचा आणि मगंच समाजाकडे निधी गोळा करण्यासाठी जायचं अशी पद्धत आहे. पहिली २-३ वर्ष तर केवळ कार्यकर्ता निधीवरंच यात्रेची धुरा होती. हिंदू जीवन पद्धतीच्या सणांमध्ये नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिलेला आहे. हल्ली घरोघरी गुढी उभारणं कमी झालय. त्यामुळे समाज हेच आपलं घर या नात्याने सार्वजनिक गुढी ही संकल्पना पुढे आली. आणि यातून गुढी साठी लागणाऱ्या साड्या या आदिवासी पाड्यातील महिलांना देण्यात आल्या. या यात्रेमधून जी काही रक्कम शिल्लक राहते ती जव्हार येथील वनवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या प्रगति प्रतिष्ठानला दिली जाते. यानिमित्ताने संघटीत झालेली तरुण पिढी ही रद्दीदानासारखे उपक्रम राबवून त्याची मदत वनवासी बंधूंना कशी होईल यासाठी वर्षभर काम करत असते. नळपाणी योजना, मूकबधिरांची शाळा यासाठी यात्रेच्या माध्यमातून वेळोवेळी मदत झालेली आहे.

          प्रत्येक वर्षीचं यात्रेचं आकर्षण म्हणजे २० फूट उंच पर्यावरण स्नेही प्रतिकृती. यावर्षी “शूरवीर बाजीप्रभू देशपांडे” यांची प्रतिकृती आहे. पर्यावरण रक्षणाचा विचार करून कागद्याच्या लगद्याची प्रतिकृती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तयार करतात. रांगोळी हा विषय लोकांपर्यंत पोहोचावा या निमित्ताने संस्कार भारती रांगोळी तसंच रांगोळी आणि स्वास्थ्य यावर शिबिरे घेतली गेली आहेत. सगळीच कार्य ही काही नेहमी या स्वागत यात्रे अंतर्गत होतातंच असं नाही. त्यासाठी वेगळी माध्यमं वापरली जातात. या माध्यमांचा रस्ता दर्शवणारी ही एक पहिली पायरी आहे. समाज संघटीत करण्यासाठी, युवाशक्तीची उर्जा योग्य ठिकाणी खर्ची घालण्यासाठी, आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या गौरवशाली परंपरेची गुढी पुढल्या पिढीच्या हातात देण्यासाठी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा हे एक उत्तम माध्यम आहे.

          प्रत्येक क्षणी नकारात्मक विचार हा धोकादायक ठरू शकतो. प्रत्येक गोष्टी मागची पार्श्वभूमी जाणून घ्यायला हवी. उत्सव हा समाजाचा असतो. उत्सव साजरा करायचा म्हणजे समाजाला एकत्र आणायचं. आताची तरुणाई यात हिरीरीने भाग घेते त्यावेळी याला दिखाऊपणा म्हणण्या आधी जर त्यांना प्रोत्साहन दिलं तर ती अधिक क्षमतेने उभारी घेईल. आणि अशाच उत्साहाने आणि सद्हेतूने प्रेरित युवाशक्तीमुळेच हा समाज पर्यायाने देश प्रगतीच्या एक एक पायऱ्या चढत विश्वगुरुस्थानी विराजमान होणार आहे.

शेवटी इतकंच म्हणावसं वाटतं – “स्वयंप्रेरित युवा, घडवेल समाज नवा”

 

  • – श्रीधर हरी आगरकर.